जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात बालदिनापासून महिला व बालविकास विभागातर्फे १४ ते ३० नोव्हेंबरदरम्यान अनाथ प्रमाणपत्र पंधरवाडा राबविण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास विभागाचे अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी दिली.
या पंधरवड्यात बालगृहात असलेल्या अनाथ मुलांचे आई-वडील, नातेवाइकांचा शोध घेतला जाणार असून, अनाथ मुलांना प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत शासकीय, स्वयंसेवी बालगृहात दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडताना त्यांच्या जवळ जातीचे प्रमाणपत्र नसते. त्यामुळे त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदान व विशेष लाभ मिळत नाहीत. त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. बाल न्याय अधिनियमानुसार मान्यताप्राप्त शासकीय व स्वयंसेवी (० ते १८ वयोगटासाठी कार्यरत, अनुदानित, विनाअनुदानित) संस्थांमध्ये दाखल अनाथ असलेल्या मुलांना अनाथ प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. आयुक्त, महिला व बालविकास आयुक्तालय यांच्या निर्देशानुसार बालगृहातून बाहेर पडलेल्या अनाथ प्रवेशितांनी त्यांच्या शेवटच्या वास्तव्यास असलेल्या संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन महिला व बालविकास विभागा अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी दिली.