मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदा देखील कोकण विभागाने निकालात आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेला बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. आज दुपारी विद्यार्थी हा निकाल पाहू शकणार आहेत. तर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार यंदाचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. १२ वीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.१ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४. ६९ टक्के अधिक आहे. त्यामुळे १२ वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. गेल्यावर्षीपेक्षा १ टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. दिव्यांग श्रेणीत ९३ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
दरम्यान, राज्यातून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात ३ हजार १९५ केंद्रावर यंदा १२ वीची परीक्षा पार पडली. आज दुपारी विद्यार्थी निकाल पाहू शकणार आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मे पासून ५ जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येईल. उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे.