जळगाव प्रतिनिधी । भुसावळ-मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्याजवळ बायोडिझेलचा काळाबाजार करून ज्यादा दाराने विक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून २० लाख ७५ हजार रूपये किंमतीचे २५ हजार लिटर बायोडिझेलसह टॅकर जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात बायोडिझेल विक्री करणारी टोळी सक्रिय झाल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांना मिळाली . त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने २७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास भुसावळ मुक्ताईनगर चौपदरी रोडवर असलेल्या हॉटेल गरीब नवाज ढाब्या जवळ छापा टाकला. यात बायो डिझेलची काळ्या बाजारात चोरटी विक्री करण्यासाठी जमिनीत असलेले दोन टॅकर टाक्यात बायोडिझेल भरलेले आढळून आले. तर उर्वरित बायो डिझेल हे अवैधरित्या साठा करून पाईन लाईनला डिस्पेन्सर मशिनद्वारे साठा करत असतांना रंगेहात आढळून आले. या कारवाईत २० लाख ७५ हजार रूपये किंमतीचे २५ हजार लिटर बायोडिझेलसह, २० लाख रूपये किंमतीचे टॅकर आणि १ लाख २० हजार रूपये किंतमीचे इतर साहित्य असा एकुण ३१ लाख ९५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीसांनी मालक युसूफ खान नुर खान (वय-५४) रा. सिध्देश्वर नगर वरणगाव ता. भुसावळ, कामगार आफताब अब्दुल कादर राकोटीया (वय-२१) रा. हिना पार्क वरणगाव, आणि टॅकर चालक बेचु मौर्या चंद्रधन मौर्या (वय-४१) रा. खरगपूर पो. मेहनगर आजमगड उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेतले आहे. यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सपोनि जलिंदर पळे, सहाय्यक फौजदार युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पो.कॉ. दिपक पाटील, पो.ना. रणजित जाधव, पो.ना. किशोर राठोड, पोकॉ श्रीकृष्ण देशमुख, चालक दर्शन ढाकणे, पोहेकॉ भारत पाटील यांनी कारवाई केली