चाळीसगाव प्रतिनिधी । प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन व्यापातून थोडा वेळ तरी बायकोसाठी काढावा असा सल्ला मनोज गोविंदवार यांनी दिला. शेठ ना. बं. वाचनालयात सुरु असलेल्या व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
बायकोचे मानसशास्त्र विषयावर व्याख्यान
मनोज गोविंदवार यांनी बायकोचे मानसशास्त्र या विषयावर व्याख्यान दिले. त्यांचे स्वागत वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रीतमदास रावलानी यांनी केले. तर परिचय संचालक विश्वास देशपांडे यांनी करून दिला. आपल्या व्याख्यानात गोविंदवार म्हणाले की, संसारात वादाची कारणे बर्याच वेळा किरकोळ असतात पण यातूनच सुखी संसारात वितुष्ट निर्माण होते. काही बायका फक्त घर सांभाळतात तर काही अर्ध वेळ काम करून घर सांभाळतात. काही बायका काही उद्योग व्यवसाय करून घर खर्चाला हातभार लावतात. तर काही बायका पूर्णवेळ नोकरी करून घर आणि नोकरी दोन्ही आघाड्या सांभाळतात. बायको यापैकी कोणतेही काम करत असली तरी तिचा घरासाठीचा त्याग फार मोठा असतो. आपले घरदार, आईवडील एवढेच काय पण नावसुद्धा मागे सोडून ती येते.
कौतुकाचे दोन शब्द हवे
गोविंदवार पुढे म्हणाले की, बायकोच्या फार काही अपेक्षा नवर्याकडून नसतात. पण कधीतरी नवर्याने आपल्यासाठी वेळ काढावा, आपल्याला फिरायला घेऊन जावे, आपले कौतुक करावे असे त्यांना वाटते. एरव्ही संसारासाठी २४ तास कष्ट उपसण्याची त्यांची तयारी असते. फक्त त्यांनी दोन शब्द कौतुकाचे हवे असतात. पाठीवर शाबासकीची थाप हवी असते. घरात टीव्ही पाहण्याऐवजी एकमेकांशी संवाद वाढवता आला तर तो नक्की वाढवावा. सासू सुनांचे भांडण असलेल्या सिरीयल पाहण्यापेक्षा काही भाषणे, शास्त्रीय संगीत ऐकणं, चांगली पुस्तकं वाचणं हे आपणही करावं म्हणजे मुलंही करतील आणि घरातील वातावरण चांगलं राहील.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी वाचनालयाचे संचालक बाबासाहेब चंद्रात्रे, प्रा. लक्ष्मीकांत पाठक, मनीष शहा, मधुकर कासार, विश्वास देशपांडे, सौ मालती निकम, मिलिंद देव आदी उपस्थित होते. सहसचिव चिमणपुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या व्याख्यानाला गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथपाल अण्णा धुमाळ,ज्योती पोतदार, प्रशांत वैद्य,श्याम रोकडे यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.