अयोध्या: वृत्तसंस्था ।” भविष्यात कोणत्याही मशिदीला हात लावला जाणार नाही, बाबरी मशीद काँग्रेसने पाडली आणि आम्हाला आरोपी करण्यात आले. हे एक कारस्थान होते आणि ते काँग्रेसने केले. उत्तर प्रदेशातील आमचे सरकार पडावे हाच त्यामागील उद्देश होता. आम्ही बाबरी मशिदीचे अवशेष कधीही पाडू इच्छित नव्हतो, असे असे विनय कटियार यांचे म्हणणे आहे .
अयोध्येतील बाबरी मशिद ६ डिसेंबर १९९२ ला पाडली त्यापूर्वी ५ डिसेंबर १९९२ ला अयोध्येत रात्री १० वाजता बजरंग दलाचे नेते आणि तत्कालीन खासदार विनय कटियार यांच्या घरी डिनरचे आयोजन केले गेले होते. या डिनरला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आणि इतर स्वयंसेवक संघाचे नेते उपस्थित होते. सीबीआयने तपासात विनय कटियार यांचे नाव समाविष्ट केले आणि त्यांच्यावर कट रचण्याचा आरोप लावला. कोर्टाने मात्र सीबीआयचा हा आरोप मान्य केला नाही. आपण तेथे केवळ प्रतिकात्मक कारसेवेबाबत योजना तयार केली होती, असे कटियार यांचे म्हणणे आहे. मशीद पाडण्याबाबतच्या कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झालेली नव्हती, असे ते पुढे म्हणाले.
विनय कटियार यांनी सांगितले की, आडवाणी रात्री अयोध्येत पोहोचले. ते माझे नेते असल्याने मी त्यांना माझ्या घरी रात्रीच्या भोजनासाठी घरी बोलावले. आम्ही तेथे सांकेतिक कारसेवेबाबत चर्चा केली. बाबरी मशिदीजवळ कोणत्याही प्रकारची कारसेवा होणार नाही, असेही आम्ही ठरवले होते.
आमचे कारसेवक शिस्तबद्ध होते. मात्र तेथे मोठे कारस्थान रचले गेले. काही अनोळखी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तेथे आले आणि त्यांनी बाबरी मशिदीवर चढून अवशेष पाडले. आम्ही आमच्या कारसेवकांना शरयू नदीतून रेती आणण्यास सांगितले होते. तेथील परिस्थिती अनियंत्रित कशी झाली याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती,असे विनय कटियार यांनी सांगितले.
चौकशी होऊन काँग्रेसच्या भूमिका काय होती हे स्पष्ट व्हायला हवे, असेही ते म्हणाले. आमची काशी आणि मथुरेसाठीच्या आंदोलनाची कोणतीही तयारी नसल्याचेही कटियार म्हणाले.