पाचोरा/भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समिती १८ जागेसाठी निवडणूक होणार असून, या निवडणुकीत कोण कोणासोबत जाणार याविषयी चर्चेला उद्यान आले होते. मात्र आज महाविकास आघाडी एकत्र येऊन राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या तिन्ही नेत्यांनी महाविकास आघाडी स्वातंत्र पॅनल तयार करून निवडणूक लढवणार असल्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी आज पत्रकार परिषद मध्ये सांगितले.
यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना शिंदे शिवसेना व भाजपाच्या विरोधात प्रचंड संतापाची लाट असून प्रचंड नाराजी पसरली आहे. यासाठी महाविकास आघाडी एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले की आमदार किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांना खोटे बोलून दिशाभूल केलेली आहे. पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती मधील जागा विक्री होत असताना, ती आम्ही थांबवलेली आहे. मात्र ही जागा विकण्यासाठी आमदारांनी काहीं विरोध केलेला नाही, मी स्वतः हायकोर्टात जाऊन न्यायालयातून ही जागा विक्रीसाठी स्टे आणला आहे. आमदारांनी शेतकऱ्यांची माफी मागावी मगच ग्रामपंचायत व विकास सोसायटीच्या सदस्यांसमोर मतदान मागावे, असे आवाहन केले आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी बोलताना सांगितले की, जागावाटपा बाबत समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने आम्ही त्यांच्याशी अजिबात युती करू शकत नाही. माजी आमदार दिलीप वाघ यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या संस्थेवरती महाविकास आघाडी करणे अत्यंत गरजेचे होते. आणि सर्व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती. म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा थोडक्यात इतिहास त्यांनी मांडला की सहकार महर्षी सर्वश्री माजी आमदार अप्पासाहेब जे. एस. पाटील (सोमवंशी) आण्णासो. गुलाबराव पवार, कै. सुपडू अण्णा पाटील, कै. के.एम. बापू पाटील, कै. ओंकार आप्पा वाघ, कै. आर. ओ. तात्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ७५ वर्षाच्या वाटचालीत आपणा सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून सर्व आवश्यक सेवा शेतकरी बांधवांना पुरवणाऱ्या या संस्थेच्या पाठीशी उभे राहून नेतृत्व करणाऱ्या दिवंगत मान्यवरांनी सातत्याने योग्य संचालक मंडळ देऊन मार्केट कमिटीचा विकास केला. दुर्दैवाने मतांच्या निवडणुकीत १००% प्रत्येक बाबतीत (शेतकरी हिताला बाजूला सारून) स्वतःच्या स्वार्थ आणि उद्योगधंदा समजणाऱ्या काही लोकांच्या ताब्यात मार्केटची सत्ता गेली. आणि शेतकरी हिताला बाजूला सारून मार्केटच्या जागेत काळेबेरे उद्योग करून स्वतःच खाजगी टोलेजंग शॉपिंग मॉल उभे करतील. शेतमालाचे वाढणारे उत्पादन आणि उपलब्ध सुविधा यांचा विचार केल्यास, आहे ती जागा मार्केटला अपूर्ण भासत आहे. आणि पुन्हा या लोकांच्या हातात सत्ता गेली तर उर्वरित सलग जागेला सुद्धा शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे. अत्यल्प दरात मार्केटचे भूखंड मार्केटच्या ताब्यातून जातील.या अतिशय गंभीर बाबीचा विचार सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल, ग्रामपंचायत सदस्य अर्थात मार्केटच्या सर्व मतदार बंधू भगिनींना करावा लागणार आहे. आम्ही सर्व मतदारांच्या प्रेमाच्या जोरावर हा डाव हाणून पाडण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. आपणा सर्वांच्या मदतीची गरज आहे. आपल्या भेटीदरम्यान या बाबी आपल्यासमोर स्पष्ट करूच आणि विविध पत्रकांच्या माध्यमातून इतर अनेक बाबींची माहिती आपल्यासमोर मांडू. महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही हे “महाविकास आघाडी पॅनल” शेतकऱ्यांच्या हितार्थ तयार केले आहे, तरी आपल्या सर्व मतदारांच्या सहकार्याची अपेक्षा करीत आहोत. माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले.
या वेळी ठाकरे गटाच्या नेत्या, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार, उध्दव ठाकरे गटाचे उद्धव मराठे, दीपकसिंग राजपूत, अरुण पाटील, विकास पाटील, खलील देशमुख, ॲड. अविनाश सुतार, उतमराव महाजन, गुढे भडगावचे उध्दव ठाकरे, गटाचे प्रशांत पवार, माच्छिंद्र पाटील, गणेश परदेशी, दिपक पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राहुल पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, डी.डी.पाटील, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, शरद पाटील, रणजीत पाटील, सुनील पाटील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.