पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धुळे-नागपूर महामार्गालगत असलेल्या एका पत्र्याच्या गोडावूनमध्ये नाशिक येथील राज्य उत्पादक शुक्ल विभागाने छापा टाकून बनावट दारूचा कारखाना नष्ट केला. यात १ कोटी ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, यातील दोषींवर स्थानिक प्रशासनाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी केली आहे.
अधिक माहिती अशी की, पारोळा नगरपरिषद हद्दीतील धुळे-नागपुर महामार्गालगत असलेल्या गट नं. १८१ मधील प्लॉट नं. १,२ व ३ या मिळकती असलेल्या पत्र्याचा गोडावुनवर नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकुन बनावट दारू तयार करण्याचा कारखाना नष्ट करण्यात आला. यात १ कोटी ६४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आलेले देशी मद्य व मद्य तयार करण्याचे रसायने, साहीत्य, मशनरी व वाहतुकीची वाहने यांचा समावेश आहे. सदरची कारवाई ही अत्यंत मोठ्या स्वरूपाची कारवाई समजली जात आहे. सदरच्या कारवाईत जप्त करण्यात आलेला दारू साठा, रसायने पाहता सदर कारखाना बऱ्याच दिवसांपासुन सुरू असल्याबाबतची जोरदार चर्चा समाज माध्यमांतुन ऐकण्या येत आहे. असे असतांना स्थानिक प्रशासन अनभिज्ञ असल्याबाबतचा आव आणत आहे.जणू आमचा याच्याशी काहीही संबंध नाही . सदर बनावट दारू निर्मिती संदर्भात सामान्य जनमानसात चर्चा असतांना वरील सर्व कारभार मुक संमातीने सुरू होता व त्यामुळे समाजात चीड आणि सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दैनंदिन देखील वाढते चोरी सत्र, अवैध धंदे यांचेवर कुठलीही ठोस कारवाई करतांना स्थानिक प्रशासन दिसत नसल्याने जनतेकडून असंतोष व्यक्त केला जात आहे.
सदरप्रकरणी स्थानिक प्रशासनाची कसुन चौकशी करण्यात यावी व स्थानिक प्रशासनातील जबाबदार दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांचेकडे केलेली आहे.