औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादच्या बजाज कंपनीतील १४० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतरही ही कंपनी सुरू आहे. हे सरळसरळ नियमांचे उल्लंघन असून बजाज कंपनीतून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचा आरोप कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद येथील बजाज कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे.
औरंगाबादमधील बजाज कंपनीतील १४० कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १८ मे २०२० रोजी जारी केलेल्या एका शासन निर्णयानुसार (जीआर) एखाद्या कंपनीत दोन किंवा अधिक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यास ती कंपनी तात्काळ बंद करून ४८ तासांत तिचं निर्जंतुकीकरण करणे अपेक्षित आहे. बजाजमध्ये तब्बल १४० कर्मचारी बाधित असतानाही कंपनी राजरोस सुरू आहे. बजाजचे खिसे भरण्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा हा भयंकर प्रकार आहे. मी प्रशासनाचा निषेध करतो. बजाजचे वरपर्यंत लागेबांधे असल्यामुळेच हे सुरू आहे,’ असा आरोप जाधव यांनी केला आहे. तसेच कामगारांचा जीव धोक्यात टाकून कंपनी चालत असेल तर ती कंपनी काहीच उपयोगाची नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की, तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देवून ही कंपनी बंद करा, अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.