औरंगाबाद (वृत्तसंस्था) मुस्लिम बांधवांना बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारने मुस्लिम बांधवांना केले आहे. परंतू बकरी ईदच का प्रतिकात्मक साजरी करायची? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील राम मंदिराचे प्रतिकात्मक भूमिपूजन करावे, अशी मागणी एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.इम्तियाज जलील यांनी बकरी ईदवर घातलेल्या निर्बंधांचा विरोध केला आहे. याविषयावर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मुस्लिम बांधवांनी बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करण्याच्या मुद्द्यावर इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांना हे सर्व मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले असून खेड्या पाट्यावरुन लोक आपली जनावरे घेऊन येत असतात. त्यांनी काय करायचे?. श्रीमंतांकडे स्मार्ट फोन आहेत. ते लोक ऑनलाइन पद्धतीने बकऱ्यांची खरेदी विक्री करू शकतील. मात्र, ज्यांच्याकडे केवळ एक-दोन बकरे असतात, त्यांनी आता काय यासाठी फोन घ्यायचा का? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील राम मंदिराचे प्रतिकात्मक भूमिपूजन करावे, असे देखील म्हटले आहे.