जळगाव प्रतिनिधी । ऑनलाईन पडदे खरेदीचा बहाणा करुन एका भामट्याने दुकानदाराच्या बँक खात्यातून २७ हजार रुपये परस्पर काढल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रमोद मनोहर कावणा (रा.गायत्रीनगर) यांची फसवणूक झाली आहे. कावणा यांचे पडदे विक्रीचे दुकान आहे. २१ जूलै रोजी ७६६२८६६८२५ या क्रमांकावरुन श्रीधर यावद नावाच्या व्यक्तीने कावणा यांना फोन केला. पडदे खरेदी करायचे असल्याचे त्याने सांगीतले. दरम्यान, त्यासाठी ऑनलाईन पेमेंट देणार असल्याचे त्याने कावणा यांना सांगीतला. यासाठी ३१ जूलै रोजी कावणा यांचा गुगल पे नंबर घेऊन भामट्याने त्यांच्या बँक खात्यातून २७ हजार रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी कावणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोमवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.