फैजपूर प्रतिनिधी । येथील झुंबा डान्स ग्रुप्सच्या वतीने संसाराच्या रहाटगाड्यात रममाण झालेल्या गृहलक्ष्मीला स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी नृत्य हे माध्यम गवसले. झुंबा डान्स ग्रूपच्या संचालिका वृषाली महाजन यांच्या नृत्य मार्गदर्शनाखाली फैजपुर मधील गृहिणी संगीताच्या माध्यमातून एकत्र आल्या.
नृत्य मनाला आनंद देणारी गोष्ट असून नृत्यातून आरोग्य साधना जपली जाते. याचे आदर्श उदाहरण झुम्बा डान्स ग्रुपच्या माध्यमातून प्रत्ययास येत आहे. गृहिणी एकत्र आल्यावर विचारविनिमयातून स्वतःचा संसार आनंददायी करण्यासोबतच समाजासाठी काही विधायक गोष्टी करण्याच्या योजना सुरू झाल्या आणि यातून सामाजिक चळवळची सुरुवात झाली. सद्यस्थितीत प्रत्येकजण व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थेत गुंतलेला असल्याने त्यातून काही वेळ स्वतःचे छंद जोपासण्यास झोकून दिले पाहिजे.
नृत्यातून स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे उत्थान व्हावे या कल्पनेतून झुम्बा डान्स ग्रुपची स्थापना झाली आणि आज बघता बघता या झुम्बा डान्स ग्रुपचे वलय विस्तारले. झुम्बा डान्स ग्रुपच्या संचालिका वृषाली महाजन यांनी समाजातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाचे समाधान व्यक्त करीत यापुढेही ही आनंद यात्रा यापुढे सुरू ठेवू असे मत व्यक्त केले. या झुम्बा ग्रुपमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील गृहिणी सहभागी असून त्यांनी नृत्यामुळे जीवनात आनंद निर्माण झाल्याचे समाधान व्यक्त केले. ही बाब समाजासाठी आणि खासकरून महिला वर्गासाठी आशादायी आहे.