फैजपूर : वृत्तसंस्था । महाराष्ट्रात ४ एप्रिलरोजी कडक निर्बध जाहीर करताना केश कर्तनालये बंद ठेवावी असा निर्णय झाला या शासनाच्या निर्णयाचा फैजपूर शहरातील व महाराष्ट्रातील नाभिक समाजाने निषेध केला आहे
. एक निवेदन फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांतधिकारी कडलग व नगर परिषदेचे मुख्याधिकारी चव्हाण यांना समाजाचे प्रतिनिधी बंटी आंबेकर यांच्यामार्फत देण्यात आले.
हातावर पोट असलेला नाभिक समाज आहे व केशकर्तन हा परंपरागत व्यवसाय असून सलून व्यवसाय अडचणीत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनी सलून दुकानांकडे पाठ फिरवल्यामुळे गेले वर्षभर सगळे हवालदिल झाले आहेत सलून व्यवसायिकांना दुकान भाडे, घर भाडे, लाईटबिल, पाल्यांचे शिक्षण, दैनंदिन अन्नधान्याबाबत आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
आर्थिक समस्यांना कंटाळून महाराष्ट्रातील विविध भागातील सलून व्यवसायिकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. सलून व्यावसायिकांनी शासनाकडे वारंवार आर्थिक मदतीचे निवेदन देऊनही त्याची दखल अद्याप घेतलेली नाही.
महाराष्ट्र शासनाने एकदातरी सिद्ध करावे कि सलून व्यवसायिकांमुळे कोरोनाचा फैलाव होतो, का सलून व्यवसायिकांना कोरोनाचा हॉटस्पॉट ठरविले जाते ? बँकांमध्ये, बाजार पेठेत, अन्य व्यवसायिक दुकानांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होत नाही का ? सलून व्यवसायिकांनाच बळींचा बकरा का बनविले जाते ? नाभिक समाज गरीब आहे पण स्वबळावर जगणारा समाज आहे, या समाजास शासनाने कुठलीही मदत नाही केली तरी चालेल पण त्यांचे तोंडची भाकरी तरी हिसकावू नका. आधी जसे सलून व्यवसायिक शासकिय निकषाचे पालन करून व्यवसाय करत होता तसाच आता सुद्धा करील व होणाऱ्या बेरोजगारीची झळ अंशतः कमी होईल , असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे .
शासनाने परवानगी न दिल्यास समस्त नाभिक समाज रस्त्यावर उतरेल, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी निवडणुकांवर बहिष्कार करेल. लाखो सलून व्यावसायिकांच्या पोटावर पाय देणाऱ्या आघाडी सरकारचा फैजपूर नाभिक युवा संघ जाहीर निषेध करीत आहे, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले . फैजपूर शहरातील समस्त नाभिक बांधवांनी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांना वैयक्तिक साध्या पोष्टाने पत्र पाठवत आंदोलन केले
यावेळी फैजपूर नाभिक समाजाचे अध्यक्ष बंटी आंबेकर, सचिव प्रमोद जगताप, मयूर बोरसे, गोलू हातकर, अनिल मानकरे, वहिद सलमानी, साजिद सलमानी, सागर जाधव, शुभम सोनवणे आदी उपस्थित होते.