फैजपुर प्रतिनिधी । येथील ऐतिहासिक नगरातील मल्हारी मार्तंड खंडोबाच्या यात्रोत्सवाला सोमवार ९ मार्च पासून सुरूवात होत आहे. या यात्रोत्सवात प्रशासनाची जय्यत तयारी सुरू केली आहे.
स्व.महंत नश्याम दासजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व संत महंतांच्या सहकार्याने सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या फैजपूर या ऐतिहासिक नगरीतील मल्हारी मार्तंड खंडोबाच्या यात्रोत्सवाला ९ मार्च पासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने मंदिराचा परिसरात स्वच्छ करण्यात आला असून मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे.
देवस्थानाच्या परिसरात लहान मोठयांच्या आवडीनुसार विविध प्रकारचे पाळणे, खाद्यपदार्थ, खेळणी, संसारोपयोगी वस्तू, लोखंडी चूल, घाटयाची पातेले, मौत का कुवा, सर्कस, तमाशा तसेच लहान-मोठे दुकाने थाटण्याची लगबग सुरू झाली आहे. अध्यात्मिक वैभव लाभलेल्या तसेच खानदेशातील प्रति जेजुरी समजल्या जाणाऱ्या येथील खंडोबा स्थानाची यात्रा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. यात्रेनिमित्त खान्देशातील भाविक दर्शनासाठी मोठी हजेरी लावतात. यात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश यासह भारतातून विविध विभागातून व्यावसायिक येथे दाखल झाले आहेत. खानदेशातील नंदुरबार, जळगाव आणि धुळे या भागातून आलेले व्यवसायिक जागा सांभाळून दुकाने थाटण्याच्या तयारीला लागले आहेत.
यंदा मौत का कुवा व तमाशाचे विशेष आकर्षण यात्रेकरूंना आहे. मल्हारी खंडोबा महाराज यांच्या देवस्थानाला रंगरंगोटी करण्यात आली असून परिसरही स्वच्छ ठेवण्यात आला आहे. या परिसरात पाण्याची व्यवस्था व लाईटची व्यवस्थाही करण्यात आली असून देवस्थानाच्या व्यवस्थापनाने व्यवसायिकांना दुकान थाटण्यासाठी जागा आरक्षित करून दिली आहे. देवस्थानचे महाप्रवेशद्वारही सजविण्यात आले असून प्रवेशद्वारावर रोषणाई करण्यात आली आहे. लेवा पाटीदार समाजाचे कुलदैवत म्हणून मल्हारी मार्तंड खंडोबा महाराज यांचे भव्य असे हे देवस्थान असल्याने तसेच इतर समाजाचेही श्रद्धास्थान असलेल्या मल्हारी खंडोबा महाराजांपुढे नवस बोलण्याची प्रथा आहे. भाविक मोठ्या संख्येने खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी येतात. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येतात. यात्रा चार ते पाच दिवस दिवस-रात्र सुरू असते. यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी येथील पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, राजकीय पदाधिकारी, पत्रकार सहकार्य करीत आहे.