एरंडोल, प्रतिनिधी । फेरीवाले हे नागरी अर्थव्यवस्थेचे महत्वाचे घटक असुन नागरिकांना आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तु व सेवांची उपलब्धता सुनिश्चित करुन देण्यात त्यांची महत्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी केले.
नगर पालिका सभागृहात आयोजित एरंडोल न.पा.अंतर्गत पंतप्रधान फेरीवाला आत्मनिर्भर निधी योजनेच्या क्षेत्रिय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत मुख्याधिकारी किरण देशमुख बोलत होते. .याप्रसंगी नागराध्यक्ष रमेश परदेशी, लीड बँक अधिकारी अरुण प्रकाश, एम.एफ.आय.प्रायव्हेट जळगावचे प्रतिनिधी अनंत राऊत, फेरीवाला समितीतील प्रतिनिधी, सीएफएलच्या प्रतिनिधी रुपाली पाटील,शहरातील सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक, नगर पालिका कार्यालयीन अधिक्षक संजय ढमाळ, डॉ.अजित भट, महेंद्र पाटील, कुसुम पाटील आदी उपस्थित होते.
मुख्याधिकारी देशमुख यांनी पुढे सांगितले की, कोविड १९ या रोगामुळे या विक्रेत्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला असुन अशा फेरीवाले पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवल पतपुरवठा तातडीने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी फेरीवाले साठी सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच लीड बँक अधिकारी अरुण प्रकाश यांनी या योजनेची माहिती देतांना सांगितले की, योजनेत फेरीवाल्यांना दहा हजार रुपया पर्यंतचे खेळते भांडवल उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच नियमित परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देणे व डिजिटल व्यवहाराला महत्व देणे हे या योजनेची उद्दिष्ट असुन शहरातील विविध बँका, नॉन बँक फायनान्स, मायक्रो फायनान्स कंपन्या, बचत गटाच्या माध्यमातून ही रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाणार आहे .त्यासाठी कोणतेही तारण घेतले जाणार नाही. या योजनेसाठी २४ मार्च २०२० रोजी व त्यापुर्वी शहरात पथविक्री करीत असलेल्या सर्व पथ विक्रेते पात्र आहेत.नगर पालिकेने प्रदान केलेले प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र असलेले विक्रेते किंवा सर्वेक्षणात आढळलेले पण त्यांना ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र मिळाले नसलेले पथ विक्रेत्यांना लागु असेल असे सांगितले. तसेच पथ विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारद्वारे कॅश बॅक मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.