मुंबई : वृत्तसंस्था| राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिले आहेत. फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल असं फडणवीस म्हणाले.
यावेळी ठाकरे सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. घटनात्मकरित्या मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख नाहीत. तर राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारची नेमणूक करत असतात. त्यामुळे त्यांच्या बाबत बोलताना जपूनच बोललं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. मीरा भाईंदरमध्ये भाजप मजबूत असून भाजपमध्ये कोणताही वाद नसल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. काँग्रेसने कुणाला अध्यक्ष करावं आणि कुणाला करू नये हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असं सांगतानाच आता देशातच काँग्रेस उरली नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. तसेच काँग्रेसच्या आंदोलनाचीही त्यांनी खिल्ली उडवली. अटक करवून घेण्यासाठीही काँग्रेसकडे कार्यकर्ते नसल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला.