जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील एका खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुली अधिकाऱ्याने कर्जदाराकडून दरमहा हप्त्याची रक्कम घेऊन हप्ता न भरता १ लाख ८२ हजार २७९ रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात बुधवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर शहरातील तरासना फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड नावाची फायनान्स कंपनी आहे. या ठिकाणी अजय दिलीप सावळे रा. घोडसगाव ता.मुक्ताईनगर हा त्या ठिकाणी कर्ज वसुली अधिकारी म्हणून नियुक्तीला आहे. या फायनान्स कंपनीतून अनिल बापू बिल (वय-२८) रा. गिरजा कॉलनी, जामनेर यांनी या फायनान्स कंपनीतून मे -२०१८ मध्ये कर्ज घेतले होते. दरम्यान वेळोवेळी अनिल भिल यांनी कर्ज वसुली अधिकारी अजय सावळे यांना कर्जाची मासिक हप्ते ऑनलाईन पध्दतीने, गुगल-पे व प्रत्यक्ष स्वरूपात दिले. पैसे दिल्या संदर्भात त्यांना कुठलाही स्वरूपाची पावती दिलेली नाही. दरम्यान त्यांनी फायनान्स कंपनीत जावून तपासणी केली असता त्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम भरलेले नसल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनिल भिल यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता कर्ज वसुली अधिकारी अजय दिलीप सावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दीपक मोहिते करीत आहे.