जामनेर प्रतिनिधी | वसूली करून जामनेरकडे येणार्या फायनान्स कंपनीच्या कर्मचार्याला मारहाण करून लुटण्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, कविराज प्रभाकर हरणे (वय २४, रा. शंकरनगर) हा तरूण फिनकेअर स्मॉल फायनान्स या खासगी वित्तीय संस्थेत वसुली कर्मचारी म्हणून काम करतो. त्यांच्याकडे तालुक्यातील बचतगटांनी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीचे काम आहे. या अनुषंगाने कविराज हा खडकी येथून वसुली करून जामनेरकडे येत होता. या वेळी गावापासून दोन किलोमीटर अंतरावरच दुचाकी अडवून त्यास जबर मारहाण केली. तसेच त्याच्याकडील ३४ हजार ३८० रुपयांची रोकड, कंपनीचा एक टॅब, पावती पुस्तके असा मुद्देमाल हिसकावून नेला. याप्रकरणी कविराज याने रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.