जळगाव प्रतिनिधी । प्रधानमंत्री फळ पिक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याने ती भरपाई तातडी मिळावी अशी मागणी भडगाव तालुक्यातील शेतकरी शशिकांत महाजन यांनी आज शनिवारी १७ जुलै रोजी दुपारी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांची भेट घेवून निवेदन दिले आहे.
शेतकरी शशिकांत महाजन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील विम्याचे हप्ते गेल्यावर्षी भरले होते. त्यानंतर खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठे नुकसान झाले असून याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागला. 5 जून 2020 रोजीचा शासन निर्णयनुसार लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना लागू असलेला निर्णय व विमा योजना याची नुकसान भरपाई अपेक्षित होती. परंतु नैसर्गिक संकटाचे शासकीय अहवाल व पंचनामे होवून तो अहवाल अद्यापपर्यंत शासन दरबारी पोहोचले नाही. शासकीय पातळीवरून फळ पिक विमा संदर्भातल्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना आज शनिवारी १७ जुलै रोजी दुपारी देण्यात आले. या निवेदनावर शशिकांत सुदाम महाजन यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.