पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा – भडगाव तालुक्यातील फळपिक गळती झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. यासंदर्भात खासदार उन्मेष पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे.
खरीप हंगामातील जुलै महिन्यात जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिंपळगाव (हरेश्वर) परिसरासह संपूर्ण पाचोरा व भडगाव तालुक्यातील प्रमुख फळपीक असलेले मोसंबी व लिंबूसह, डाळींब, पेरू, सीताफळ या फळविकांच्या मृग बहारात मोठ्या प्रमाणात फळगळती झाली होती. यासंदर्भात पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी व महसूल विभागाकडे नुकसानीबाबत वारंवार माहिती देऊन देखील संबंधित विभागाकडून नुकसानीची कुठलीही दखल घेतली न गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्याकडे सदर नुकसानीची माहिती दिली असता त्यांनी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वात भा.ज.पा. किसान मोर्चाच्या माध्यमातून जि. प. सदस्य मधुकर काटे, भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार, किसान मोर्च्या चे पाचोरा अध्यक्ष विश्वास पाटील, भडगाव अध्यक्ष यशवंत पाटील यांच्या उपस्थितीत दि. १३ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०२१- २२ मध्ये मोसंबी व लिंबूसह इतर फळपिकांचा मृग व आंबिया बहाराचा समावेश असल्याने मोसंबी, लिंबूसह इतर फळपिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे.त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत असून त्या अनुषंगाने मोसंबी व लिंबूसह इतर फळपीक विमा चे प्रमाणके (ट्रिगर) बघितले असता दि.१ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देय आहे. तसेच पावसाचा खंड पडल्यावर देखील नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आलेली असल्याचे देखील निदर्शनास आणून दिले होते. तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सदर विषयांत तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे नुकसानीबाबत माहिती दिली असता कुठलेही विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून त्याठिकाणी जाऊन संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली नसल्याची तक्रार करून अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या होत्या. तसेच विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने विमा संरक्षणाचा लाभ होईल याबाबत कारवाई करण्याची विनंती करून ज्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले नाही अशा शेतकऱ्यांना देखील नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासन स्तरावरून आर्थिक मदत करून दिलासा द्यावा. अशा विनंतीचे निवेदन दिले होते. त्यामुळे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन – २०२१ – २२ अंतर्गत भडगाव तालुक्यातील लिंबूसाठी ३४९, मोसंबीसाठी ३३, व डाळींब साठी २ असे एकूण ३८४ शेतकऱ्यांना २ कोटी २ लाख ६९ हजार १०० रुपये तर पाचोर्यातील लिंबूसाठी ५४, मोसंबीसाठी ९५, पेरूसाठी ०२, डाळिंबसाठी २, सीताफळसाठी २, असे एकूण १५५ शेतकऱ्यांना १ कोटी २२ लाख ९२ हजार ९०० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याकरिता अमोल शिंदे यांनी पाचोरा- भडगाव तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने माजी मंत्री आ. गिरीश महाजन खासदार उन्मेष पाटील व आमदार राजूमामा भोळे यांचे आभार मानले.