मुंबई : वृत्तसंस्था । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे.
फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांसोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे.
भाजपच्या इतर नेत्यांच्या सुरक्षेतही कपात केलेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात केली आहे. राज ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. ती काढून त्यांना आता वाय प्लस सुरक्षा देण्यात येईल.
मुंबई पोलिसांनी फडणवीसांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल दिल्यांनतर त्यांच्या सुरक्षेत कपात न करण्याची शिफारस करण्यात आली होती. राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनीसुद्धा फडणवीसांच्या सुरक्षा कपातीला विरोध केला होता. मात्र, जैस्वाल यांची बदली होताच सुरक्षा कपातीचा हा निर्णय घेतला गेला.