जळगाव प्रतिनिधी । सध्या कोविड-19 मुळे शाळा बंद शिक्षण सुरू अशी परिस्थिती आहे. शाळा जरी बंद असली तरी, केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वी. पाटील विद्यालयातील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या घरी सांगितल्यानुसार नियोजन करून उपक्रम साजरे करीत आहेत.
आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या, ही दिव्याची अवस म्हणून विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी साजरी केली. त्यात वेगवेगळ्या धातूचे दिवे स्वच्छ करून त्यांची पिवळी फुले आघाडा दुर्वा वापरून पूजा केली आणि गोड नैवेद्य दाखवून विद्यार्थ्यांनी ‘शुभं करोति’ म्हणून हे देवा आम्हा सर्वांना या कोरोनापासून लवकर मुक्ती मिळू दे व आम्हाला लवकर शाळेत जाऊ दे, आता आम्ही खूप कंटाळलो अशी देवाकडे या लहानग्यांनी प्रार्थना म्हणत दीप अमावस्या साजरी केली. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आपापल्या वर्गातून घरी उपक्रमांविषयी माहिती व्हाट्सअप च्या माध्यमातून देत आहेत.