यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील २१ वर्षीय तरूणावर तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना रात्री घडली आहे. हा हल्ला प्रेमप्रकरणातून झाला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहरातील काजीपुरा भागात राहणारा जावेद युनूस पटेल (वय-२१) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचे व एका महिलेचे प्रेमसंबंध होते. दरम्यान, फैजपूर येथील अनोळखी तीन जणांनी गुरूवार ५ मे रोजी रात्री १० वाजता जावेद याला भेटण्यासाठी आले. त्याला गोड बोलून दुचाकीवर बसवून भुसावळ रोडवरील पीर बाबा दर्गाजवळ जावेदवर तीन जणांनी चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. तर घटनास्थळाहून तीनही संशयित आरोपी हे फरार झाले. दरम्यान मध्यरात्री २ वाजता काही आदीवासींना जावेद जखमीवस्थेत पडलेला दिसून आला. त्याला तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. जावेदची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला ताडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
प्रेमप्रकरणातून हा जीवघेणा हल्ला झाला असल्याचा आरोपी जखमी जावेदच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक अशित कांबळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत यावल पोलीसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.