नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।“आता कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून, दिल्लीत दिवसाला अमेरिकेपेक्षाही जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या,” असा दावा केजरीवाल यांनी केला.
मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक झालेल्या दिल्लीत तिसरी लाट ओसरू लागली आहे. हळूहळू दिल्ली पूर्वपदावर येत असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कोरोना परिस्थितीविषयी माहिती दिली.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संवाद साधला. यावेळी केजरीवाल म्हणाले,”दिल्लीकरांच्या सहकार्यांमुळे सरकारनं परिणामकारक आणि यशस्वीपणे तिसऱ्या लाटेवर मात केली आहे. दिल्लीत कोरोनाची पहिली लाट जूनमध्ये आली होती. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला होता. तिसरी लाट खूप भयंकर होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आलेल्या तिसऱ्या लाटेत एकाच दिवशी १३१ जणांचा मृत्यू झाला होता,” असं केजरीवाल यांनी सांगितलं.
“शेतमालाचा भूसा जाळण्यात आल्यामुळे प्रदूषण वाढलं. त्यामुळे नोव्हेंबर तिसरी लाट निर्माण झाली. आमच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी दररोजच्या चाचण्यांचं प्रमाण वाढल्यानंतर हे समोर आलं. आम्ही दररोज ९० हजार चाचण्या करत आहोत. ही संख्या देशातीलच नाही, तर अमेरिकेपेक्षाही जास्त आहे,” असं केजरीवाल यांनी सांगितलं.
“१० लाख लोकसंख्येमागे ४५०० चाचण्या केल्या जात आहेत. देशाच्या आणि जगाच्या तुलनेत दिल्लीत दररोज सर्वाधिक चाचण्या केल्या जात आहेत. इतकंच नाही तर चाचण्यांमध्ये अमेरिकेचाही क्रमांक आमच्यानंतर येतो,” असा दावा केजरीवाल यांनी केला.