पुणे, वृत्तसंस्था । एका तरुणाने सोशल मीडियावर वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली असता त्यास अटक करून त्याच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता मनोज क्षीरसागर यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी फेसबुकवर अत्यंत असभ्य भाषेत एका तरुणाने १० ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
मनोज क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून खडक पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवली आहे. सूरज चव्हाण (वय 34) असं या तरुणाचं नाव आहे. सूरज चव्हाण हा कात्रज इथला रहिवासी आहे. पोलिसांनी सोमवारी उशिरा अटक केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी सूरज चव्हाणावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम आणि भारतीय दंड संहिता संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सूरजला दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले. न्यायलयाने सूरजला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.