जळगाव प्रतिनिधी | पूर्व वैमनस्यातून थेट घरात घुसुन गोळीबाराची घटना शहरातील कांचन नगरात घडल्यानंतर रात्री उशीरा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर यांनी येथे भेट दिली.
काल सकाळी आठच्या सुमारास कांचननगरातील रहिवासी आकाश मुरलीधर सपकाळे याच्या थेट घरात घुसून हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. प्रथमदर्शीनी हा हल्ला सूडचक्रातून करण्यात आल्याची माहिती मिळाली. यानंतर दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्याद दिल्याने दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी सर्व आरोपींना गजाआड केले.
दरम्यान, रात्री उशीरा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर यांनी कांचननगर भागाला भेट दिली. त्यांनी आकाश सपकाळे याच्या कुटुंबाकडून या घटनेबाबतची माहिती जाणून घेतली. त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची उपस्थिती होती.