पोलीस पाटील गाव पातळीवर शासनाचे ‘कान व डोळे’ – रोहिणी खडसे खेवलकर

मुक्ताईनगर प्रतिनिधी । पोलीस पाटलांना ग्राम पातळीवर शासनाचे ‘कान व डोळे’ म्हटल्यास वावगे ठरू नये असे मला वाटते असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी केले . कोरोना आपत्तीमध्ये ग्रामीण भागात अव्याहतपणे सेवा देऊन कायदा व सुव्यवस्था राखत प्रशासनास मदत करणारे पोलिस पाटील यांचा मुक्ताईनगर येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर अध्यक्ष असलेल्या संवेदना फाऊंडेशनतर्फे कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र, मास्क व सॅनिटाईजर देऊन सन्मान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

रोहिणी खडसे खेवलकर पुढे म्हणाल्या, गावपातळीवर महसूल आणि पोलिस खात्याचा म्हणजेच प्रशासनाचा दुवा होऊन तुम्ही काम करत असता. नैसर्गिक आपत्ती, शेतकरी आत्महत्या, शेतसारा माहिती संकलन या स्वरूपातील महसुली कामांची प्राथमिक माहिती प्रशासनास देणे. गावातील तंटे, हत्या, मारामारी व शांतता राखण्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यास प्रथम माहिती अहवाल देण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर आहे. हे काम करत असताना वेळेचे बंधन पाळत नाही. कुटुंब वाऱ्यावर सोडून पोलिसांच्या दिमतीला राहणाऱ्या पोलीस पाटलांना गावातील संभाव्य घडामोडीची गोपनीय माहिती पोलिसांना कळविण्याचीही कसरत करावी लागते. गावच्या तंटामु्क्ती समितीचा सचिव म्हणून आपण काम करता त्याचबरोबर सध्या उद्भवलेल्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्मूलन समितीचा सचिव म्हणूनही पोलिस पाटील जबाबदारी पार पाडत आहेत. बाहेरील लोकांना गावात येण्यापासून प्रतिबंध करणे, गावात आलेल्यांच्या याद्या अद्ययावत करून प्रशासनाला देणे, लोकांनी ‘लॉकडाउन’च्या काळात घराबाहेर येऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी ग्रामस्थांमध्ये वारंवार जागृती करणे ही कामे पोलिस पाटील करत आहेत. म्हणूनच पोलीस पाटलांना ग्राम पातळीवर शासनाचे ‘कान व डोळे’ म्हटल्यास वावगे ठरू नये असे

यावेळी गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्यावतीने रोहिणी खडसे खेवलकर यांच्याकडे पोलिस पाटलांना कोरोना विमा कवच मिळावे यासाठी पाठपुरावा करणे साठी निवेदन देण्यात आले त्यावर माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा करण्याचे रोहिणी खडसे खेवलकर यांनी आश्वासन दिले

यावेळी मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमाताई तडवी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, माजी सभापती राजुभाऊ माळी, भाजप तालुका उपाध्यक्ष कैलास वंजारी,शिवराज पाटील, पोलीस पाटील संघटनेचे दिपक चौधरी, विजय पाटील, अलकाताई महाजन, वृषाली भोलाणकर, कैलास बेलदार, ऋणाली ब-हाटे, सविता बढे, अनिल पाटील, जितेंद्र पाटील, मनोज महाजन, स्नेहल काळे, रेखाताई चव्हाण, अर्चना सवळे, वर्षा चौधरी, दिलीप सोळुंखे, प्रदीप काळे, संजय चौधरी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Protected Content