पालघर : वृत्तसंस्था । पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली फसवणूक करणे व पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला भुलणे महागात पडल्याची घटना पालघरमध्ये घडली या एका गुन्ह्यातून तीन गुन्हे घडले असून या प्रकरणी जवळपास १४ जणांना कासा पोलिसांनी अटक केली आहे.
मोखाडा येथील सुरेश काकड, खानवेलचा रमण भावर, जुनी जव्हारचा कमळाकर वाघ व प्रमोद भामरे यांनी संगनमत करून निरप विश्वकर्मा या वापी येथील व्यक्तीला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी १ ऑक्टोबरला कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रात्यक्षिक दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. १५ ऑक्टोबर रोजी आरोपींनी विश्वकर्मा याच्याकडील २ लाख ४० हजार रुपये दुप्पट करण्यासाठी जंगलात विश्वकर्माचे डोळे बांधून मंत्र जपण्याचा बनाव केला आणि पैसे घेऊन ते पसार झाले.
सुरेश काकड व इतरांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे धाव न घेता व्यवहारातील मध्यस्थी असलेल्या रमण भोवर याने मनोज मोर, अरविंद बिज व गोविंद वाढू यांच्या मदतीने सुरेशकडून २ लाख ४० हजार रुपये परत मागितले. १ नोव्हेंबर रोजी सुरेशला जंगलात नेले व झाडाला बांधून मारहाण केली. सुरेशचा मुलगा भास्कर याला फोन करून सुरेशला मारण्याची धमकी देण्यात आली. मात्र कासा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी जाऊन सुरेश काकडची सुटका केली.
२ नोव्हेंबर रोजी सुरेशचा मुलगा भास्कर याने अविनाश भोये, रियाझ अख्तर शेख, तेजस गवार, सुनील माळी व अन्य तीन आरोपींच्या मदतीने पुन्हा सूड उगवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुरेशचे अपहरण करणाऱ्यांपैकी गोविंद वाढू याला तलवारीचा धाक दाखवून मोटरसायकलवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सायवन पोलिस चौकी येथून जाताना गोविंदने मदतीची हाक दिली व मोटारसायकलवरून उडी मारून स्वतःची सुटका करून घेतली. तेथे नेमणुकीस असलेले पोलिस नाईक भरसट यांनी तत्परता दाखवून स्थानिकांच्या मदतीने दोन आरोपींना ताब्यात घेतले. आता पहिल्या घटनेत कासा पोलिसांनी फसवणूक व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तीनही गुन्ह्यांचा कासा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर तपास करीत आहेत.