जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील विवाहितेला माहेरहून एका लाखाची मागणी करत मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पतीसह सासरकडील व्यक्तींविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील माहेर असलेल्या आसमा अकील पिंजारी (वय-२३) यांचा विवाह जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील अकील मजीद पिंजारी यांच्यासोबत मे-२०१८ मध्ये रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाच्या दोन महिन्यानंतर विवाहितेला पती अकील पिंजारी याने बांधकामासाठी लागणारे सेंट्रींग सामान आणण्यासाठी एका लाखांची मागणी केली. विवाहितेने पैशांची पुर्तता न केल्याने तिला मारहाण करून छळ केला. तसेच सासू व जेठ यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याबाबत विवाहितने मंगळवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अकील मजीद पिंजारी, जेठ शकील मजीद पिंजारी आणि सासू फरजानाबी मजीद पिंजारी सर्व रा. शिरसोली ता.जि.जळगाव यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुनिता लेले करीत आहे.