सातारा: वृत्तसंस्था । ‘कोरोनाची महासाथ, चीनशी संघर्ष आणि अर्थव्यवस्था या सर्वच आघाड्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा… देशाची परिस्थिती बिकट आहे हेच वास्तव आहे,’ अशी जोरदार टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर केली आहे.
चव्हाण यांनी फेसबुक पोस्ट लिहून मोदी सरकारवर तोफ डागली आहे. ‘कोरोना, चीनसह अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकार साफ अपयशी ठरले आहे. त्या सगळ्या अपयशाला झाकण्यासाठीच केंद्र सरकारने सहा महिने संसदेचे कामकाज बंद ठेवले. कोणत्याही देशाने त्यांच्या संसदेचे कामकाज बंद ठेवले नव्हते. रशियात बंद होते, पण तिथे हुकमाशाहीच आहे. मात्र, भारतात ते बंद का ठेवले गेले? कारण, सरकारच्या अपयशांवर संसदेत चर्चा होऊ नये, हीच त्यामागची भूमिका होती,’ असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
‘केंद्र सरकारची स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा. तुम्हाला सध्याची स्थिती सावरता आलेली नाही. सरकार म्हणून ज्या अपेक्षा होत्या, त्या तुम्ही पूर्ण करू शकलेला नाहीत,’ असा टोलाही चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांना हाणला आहे. ‘जगातील कोणत्याच देशाने कोरोनाला देवाची करणी म्हटलेले नाही. केवळ आपल्याच सरकारने तसे म्हटले आहे.
‘संविधानात सहा महिन्यापेक्षाही जास्त काळासाठी संसदेचे कामकाज बंद ठेवता येत नाही, तशी तरतूदच आहे. त्यामुळं सहा महिने संपण्यापूर्वीच एकदा संसदेचे कामकाज सुरू केले. आता पुन्हा ते कधी सुरू करतील, याची गॅरंटी नाही,’ अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.