पृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवल्याचा भाजपचा आरोप

 

मुंबई : वृत्तसंस्था । माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप भाजपाने खोडून काढला असून, त्यांनी  खरी आकडेवारी लपवून लोकांची दिशाभूल केली आहे, असा दावा भाजपाने केला आहे.

 

लसीच्या वाटपावरून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप झडत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्राकडून त्यावर उत्तर देण्यात आलं होतं. लस वाटपाच्या या मुद्द्यांवरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकार मदतीत दुजाभाव करत असल्याचा आरोप केला होता.

 

लस वाटपाबरोबरच केंद्र सरकारने कोरोना काळात वैद्यकीय उपकरण वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप  चव्हाण यांनी केला. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. “पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रावर अन्याय केल्याची ओरड ठोकणाऱ्यांनी आणि केंद्राने मदत न केल्याचे रडगाणे कायम गाणाऱ्यांची कुवत तेवढीच आहे. पण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या अभ्यासू व अनुभवी व्यक्तीनं ओढून ताणून अशी टीका करावी हे वैफल्यग्रस्त म्हणावे लागेल,” असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

 

“सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक मास्क, पीपीई किट व हायड्रोक्सीक्लोरोक्विन गोळ्या मिळाल्या. व्हेंटिलेटर्स मिळण्याच्या बाबतीत आंध्र प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी संसदेतून जे लेखी उत्तर मिळाले, त्यातली खरी आकडेवारी लपवून चुकीचे तर्कवितर्क लावून जनतेची दिशाभूल केली आहे. पंतप्रधान मोदींनी कधीच कोणत्या प्रकारचा दुजाभाव केला नाही हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरातून दिसते. महाराष्ट्राला एन ९५ मास्क ३२ लाख, पीपीई किट १४.८३ लाख, हायड्रोक्लोरोक्विन गोळ्या ९७.२ लाख तर ४,४३४ एवढ्या व्हेंटिलेटर्सचा पुरवठा केला आहे. राज्यात सत्ता कोणाची आहे असा संकुचित विचार बाजूला ठेवून, हातच राखुन मदत केली नसून भरभरून मदत केली आहे,” असंही त्यांनी नमूद केलं आहे.

 

 

राज्य सरकारने या सगळ्या संकटकाळात राज्यातील जनतेला काय दिले? आरोग्य सुविधामध्ये काय योगदान दिले? उलटपक्षी केंद्राकडून जे व्हेंटिलेटर्स दिलेले तेही चोरीला गेल्याची माहिती मंत्रिमंडळातीलच एक मंत्री देतात. जे आहे ते ही टिकवता येत नाही, एवढी या सरकारची दुर्दशा आहे. त्यामुळे या दुसऱ्या लाटेत राज्याची दुरवस्था होताना पाहायला मिळते. गोरगरीबांना पॅकेज द्यावं, असं पत्र व मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारकडे केली होती पण राज्य सरकारने त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही याचा विसर पडलेला दिसतो,” असा टोलाही उपाध्ये यांनी पृथ्वीराज चव्हाणांना लगावला आहे.

Protected Content