मुंबई प्रतिनिधी । पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्ये प्रकरणी सोशल मीडियात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीप्सची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एक 22 वर्षीय तरूणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्यासंदर्भात काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा सर्वत्र फिरत आहेत. या प्रकरणावरून सखोल चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्रातून केली आहे.
पोलिस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्याप्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा एकूण १२ ऑडिओ क्लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे.
या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत, त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय, त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते.
या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. ही चौकशी तत्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.