पुण्यात आंदोलनासाठी भाजपने पैसे देऊन जमवली गर्दी?

 

पुणे (वृत्तसंस्था) राज्यातील ठाकरे सरकारविरोधात भाजपाने मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन केले. परंतू पुण्यातल्या आंदोलनात चक्क पैसे देऊन गर्दी जमवल्याचा धक्कदायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे निषेध कशासाठी करतोय याची माहितीच लोकांना नव्हती.

 

शेतकरी कर्जमाफी, महिलांवरील अत्याचार आणि मागील शासनाने घेतलेले निर्णय बदलणे यासारख्या अनेक मुद्द्यावरुन राज्य सरकारचा निषेध म्हणून मंगळवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक भाजपाने दिली होती. पुण्यातील गली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व चौकात शहरातील ६ मतदारसंघातून कार्यकर्ते जमा झाले होते. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत महिलांनी सांगीतले की, आमच्या भागातील कार्यकर्त्यांनी आम्हाला इथं येण्यासाठी सांगितले. यासाठी मला १०० रुपये देतील. पण आम्हाला या उन्हात बसवून फक्त वडापाव दिला आहे. साधं पाणीही दिले नाही. तर एका महिलेने सांगितले की, आमच्या भागातील नेते अशोक लोखंडे यांच्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. मेट्रोच्या कामामुळे आम्हाला घरे सोडण्यास सांगितले आहे. पण आमचं अद्याप पुनर्वसन केले नाही. याच विषयावर चर्चा करतील या विचाराने मी इथं आली. त्याचसोबत या गर्दीत असणाऱ्या राजेंद्र ढवळे यांनी भाजपासाठी काम करतो असा दावा केला. मी रोजंदारीवर काम करतो, याठिकाणी आल्यानंतर पैसे देऊ असे सांगण्यात आले होते. माझ्यासोबत ५० ते ६० माणसं आली आहेत. आम्हाला निषेधाची माहिती नाही, आमच्या हातात बॅनर्स देण्यात आले. काहीतरी पैसे मिळतील यामुळे काम बुडवून याठिकाणी आलो असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचे भाजपाने खंडण केले आहे.

Protected Content