पिंपरी-चिंचवड, वृत्तसंस्था | २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी याचा प्रयोग राबवणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. अशातच पुण्यातही नाईट लाईफ संकल्पनेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
शनिवारी पिंपरी-चिंचवड एका कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे आले असता त्यांना पत्रकारांनी पुण्यामध्ये नाईट लाईफ संकल्पना राबवणार का असा प्रश्न विचारला. त्यावर, प्रस्ताव आल्यास पुण्यातही नाईट लाईफबाबत विचार करू, असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले. “मुंबईत दिवसरात्र जे लोक मेहनत करतात, त्यांना रात्री भूक लागल्यावर कुठे जायचे, कुठे खायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. म्हणून ही संकल्पना तेथे सुरू केली. पुण्यातही कामगार, कष्टकरी मोठ्या संख्येने आहेत. त्यांनाही अशी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. नक्कीच जर तुमच्याकडून प्रस्ताव आला तर त्याबाबत विचार होऊ शकेल, पण आत्ताच ठोस आश्वासन देता येणार नाही”, असे आदित्य म्हणाले.
मुंबईत नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून नाईट लाईफ संकल्पनेची सुरुवात होईल. मुंबईत नाईट लाईफ असावे, ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार होते तेव्हाच ही संकल्पना त्यांनी मांडली होती. मात्र त्यावेळी याबाबत काही निर्णय झाला नाही. जगभरातील अनेक महानगरात नाइट लाइफची व्यवस्था आहे. तशी मुंबईतही हवी, असा विचार मांडत आदित्य ठाकरे यांनी त्यासाठी आग्रह धरला होता. वर्षभरापूर्वी सरकारने याबाबत अधिसूचना काढली होती. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्दे उपस्थित करीत या उपक्रमाला हिरवा कंदील मिळाला नव्हता. आता मात्र प्रजासत्ताक दिनापासून त्याची अंमलबजावणी प्रायोगित तत्त्वावर सुरू होत आहे.