पुणे वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाबाधितांचा आकड्याने 4 हजारचा टप्पा पार केला आहे. पुण्यात कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे सील करण्यात आले आहे. पुढील सात दिवस पुणे शहरात कडक कर्फ्यू लागू करण्यात निर्णय पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला असून तसे आदेश काढले आहेत.
पुण्यात कोरोना रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे महानगरपालिका क्षेत्र हे संक्रमणशील म्हणून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या काळात फक्त जीवनावश्यक सेवा म्हणजे आरोग्य विषयक, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, महापालिका आणि शासकीय सेवा सुरु राहतील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्र सील करण्यात आले आहे. पुढील सात दिवस म्हणजे २७ एप्रिल २०२० पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही व्यक्तींना पुणे शहर आणि इतर परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. या कर्फ्यू दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.
कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार
जो कोणी या कर्फ्यूचे उल्लंघन करतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये कर्फ्यू
पिंपरी चिंचवड शहरही कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून मध्यरात्रीपासून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सीमा बंद करण्यात आले शहरातील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांनाही ठराविक वेळ ठरवून दिला आहे. येत्या २७ एप्रिलपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.