नवी दिल्ली, वृत्तसेवा । पीएम केअर्स फंडसंदर्भातील आकडेवारी सरकारने अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली आहे. पीएम केअर्स फंड सुरु केल्यानंतर पाच दिवसांमध्ये तीन हजार कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झाला होता. मात्र सरकारने या पाच दिवसांनंतर या खात्यावर किती पैसे जमा झाले यासंदर्भातील माहिती दिलेली नाही.
सरकारी आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये पीएम केअर्स फंडच्या खात्यावर एकूण तीन हजार ७६ कोटी ६२ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यापैकी ३९ लाख ६८ हजार रुपये परदेशी चलनाच्या माध्यमातून मिळाले आहेत.पीएम केअर्स फंडच्या अध्यक्ष स्थानी पंतप्रधान आहेत.
संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री या फंडचे ट्रस्टी आहेत. २७ मार्च २०२० रोजी नोंदणी कायदा, १९०८ नुसार पीएम केअर्स फंडची नोंदणी ‘पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ म्हणून करण्यात आली आहे. संसद भवनाच्या साऊथ ब्लॉकमधील प्रधानमंत्री कार्यालय हेच पीएम केअर्स फंडचे मुख्यालय असल्याचे सांगण्यात आलं आहे. पीएम केअर्स फंड वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ३ हजार १०० कोटींची रक्कम वेगवेगळ्या कार्यासाठी देण्यात आली आहे.