नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कॉर्पोरेट संस्थांकडून पीएम केअरला येणाऱ्या निधीलाच सीएसआर अंतर्गत सवलत देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर निर्णयावर आत देशभरातून टीका होत आहे. कारण यामुळे सीएम फंडसाठी जाणारा ओघ कमी होण्याची शक्यता आहे.
देशभरातील मोठमोठ्या कॉर्पोरेट संस्थांनी सढळ हस्ते पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहायत्ता निधीमध्ये आर्थिक निधी देत आहेत. या संस्था सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबीलीटी (सीएसआर) अंतर्गत हा निधी देत असतात. त्यातून त्यांना करात सवलत मिळते. विशेष म्हणजे लॉकडाऊन सुरु झाल्याच्या १५ दिवसानंतर केंद्राला हे सांगण्यास जाग आली. त्यामुळे साहजिकच सीएम फंडसाठी जाणारा ओघ कमी होण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी देखील भाष्य केले आहे. सीएम केअरऐवजी केवळ पीएम केअरसाठी दिलेली मदतच सीएसआर अंतर्गत धरण्याचा निर्णय धक्कादायक आहे. हे चुकून झाले असल्यास दुरूस्ती करावी. पण जाणीवपूर्वक केले असेल तर केंद्र व राज्य असा भेदभाव योग्य नाही असे ट्वीट रोहीत पवार यांनी केले आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. हा सरळ सरळ दुजाभाव असून मी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडीओ कॉन्फरंसिंग दरम्यान सांगणार असल्याचे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. हे परिपत्रक घटनात्मक मुल्यांच्या विरोधात असल्याची टीका कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचे सरचिटणीस सिताराम येच्युरी यांनी केली आहे.