अहमदनगर । माजी मंत्री मधुकर पिचड यांनी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
माजी मंत्री पिचड यांनी महसूलमंत्री थोरात यांची मंत्रालयातील त्यांच्या दालनात भेट घेऊन सुमारे अर्धा तास चर्चा केली. या भेटीतील वृत्तांत बाहेर आला नसला तरी आगामी जिल्हा बँक निवडणुकीबाबत याप्रसंगी चर्चा करण्यात आल्याचे समजते. जिल्हा सहकारी बँकेत विखे विरुध्द थोरात असा सामना रंगणार आहे. विखे हे राम शिंदे, पिचड, शिवाजी कर्डिले, बबनराव पाचपुते यांच्या मदतीने पॅनल बनवण्याची शक्यता आहे. तथापि, भाजपचे काही नेते महाविकास आघाडीतीसोबत जुळवून घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे संकेत आधीच मिळाले आहेत. या अनुषंगाने पिचड यांनी घेतलेली भेट महत्वाची बानली जात आहे. पिचड हे विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपमध्ये दाखल झाले. त्यांचे सुपुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी विधानसभा निवडणूक भाजपकडून लढविली. यात थोरात यांनी त्यांच्या अकोले मतदारसंघात लक्ष घालून पिचड यांना धक्का दिला होता. यानंतर या दोन्ही नेत्यांची पहिल्यांदाच भेट झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.