पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील वाघळी गावाच्या अलीकडे वळणावर भरधाव पिकअपने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

हेमंत विष्णू चौधरी ( वय-३४) हा हिरापूर रोड चाळीसगाव येथे परिवासह वास्तव्यास होता. तसेच वाघळी येथे महावितरण कंपनी सब स्टेशनात नोकरीस होता. चाळीसगावहून सकाळी कामावर जातांना वाघळी गावाच्या अलीकडे भरधाव वेगात असलेल्या पिकअपने (गाडी क्र. एमएच ०४ एचडी ४०७४ ) दुचाकीस्वार (गाडी.क्र. एमएच १९ बीव्ही १४७७ ) जोरात धडक दिल्याने हेमंत चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच पिकअप चालक पसार झाला. मयताचे नातेवाईक संजय पितांबर चौधरी (वय-४७) रा. बजाज नगर, मालेगाव रोड चाळीसगाव हे वाघळीकडे जात असताना त्यांच्या देखत हा अपघात घडला. त्यांनी पिकअपला थांबण्याचा खूप प्रयत्न केला. त्यात ते अपयशी ठरले. त्यांनी लगेच अॅम्बुलसांना फोन करून ग्रामीण वैद्यकीय रूग्णालयात दाखल केले असता. डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय चौधरी यांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या पाश्र्चात आई-वडील, पत्नी व दोन मुली आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुंदरडे हे करीत आहेत.

Protected Content