चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | बंद घराचे कडीकोंडा तोडून स्वयंपाक घरातील कपाटातून रोकडसह ७० हजारांचा ऐवज अज्ञाताने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिंप्री बु. प्र.चा येथील विद्याबाई गोरख मोरे (वय-४५) ह्या वरील ठिकाणी वास्तव्यास आहे. शेती व्यवसाय करून त्या आपल्या उदरनिर्वाह चालवत असतात. दरम्यान विद्याबाई ह्या बाहेरगावी गेलेल्या असताना त्यांच्या राहत्या घराचे कडीकोंडा तोडून लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ५० हजार रुपये किं.ची सोन्याची पोत व २० हजार रुपये रोख असे एकूण ७० हजार रुपये किं.चा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना २४ जानेवारी सकाळी ८ वाजेपासून ते २८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात विद्याबाई गोरख मोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.