पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी)। कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द गावात उद्या ७ ते ९ जूलै पर्यंत तीन दिवसीय जनता कर्फ्युचे नियोजन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतच्या कोरोना नियंत्रण समीती, व्यावसायीक व ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वयंपूर्तीने हा बंदच्या निर्णय घेण्यात आला आहे. या बंद काळात गावातील फक्त किराणा दुकान, मेडिकल व कृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहतील. तसेच दुध डेअरी सकाळी व संध्याकाळी ७ ते ९ पर्यंतच सुरू राहणार आहे. उर्वरित सर्वच व्यवसायिक दुकाने उदया ७ जूलैपासून तीन दिवस कडकडीत बंद राहतील. या काळात दुकाने उघडी आढळल्यास त्यांच्यावर प्रशासनातर्फे कलम १८८ अन्वये कारवाई व गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
मंगळवारी गाव बंद
मंगळवार हा बाजाराच्या दिवस असतो. शासनाच्या आदेशान्वे बाजार बंद असून त्या दिवशी गावात बाहेरून येणाऱ्या व्यापारी व परिसरातील सर्वच गावातील खरेदी करणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ होते. हि बाब लक्षात घेता दर मंगळवारी गावातील सर्वच दुकाने ३० जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
ग्रामस्थांनी विनाकारण घरा बाहेर फिरू नये. प्रत्येकाने तोंडाला मास्क किवा रुमाल बांधणे सक्तीचे आहे. विना मास्क कुणी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या हितासाठी सर्वानी या तीन दिवसीय जनता कर्फ्यूस व दर मंगळवारी गाव बंद यास सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतच्या कोराना नियंत्रण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.