जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मागील दोन वर्षापासून कोरोना काळात केवळ पाच पावले ओढून पिंप्राळ्यातील विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे रथोत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट कमी झाल्याने हा रथोत्सव पूर्वीप्रमाणे जोशात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष मोहनदास वाणी यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना दिली.
रविवार दि. १० जुलै रोजी पिंप्राळा येथील १४७ वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर रथोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यात रथोत्सवात भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणारी पंजिरी प्रसाद बनवून झाला असल्याची माहिती संस्थेचे सदस्य संजय वाणी यांनी दिली. तसेच रथाची रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले आहे. तत्पूर्वी रथावर विराजमान होणारे सारथी अर्जुन, अश्व, गरुड, हनुमंत आदी देवतांच्या मूर्तीचे रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. याच प्रमाणे महापालिका प्रशासनातर्फे रथ मार्गाची डागडुजी करण्यात येत आहे. तसेच रथाला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यात येत आहे. आषाढी एकादशीनिमित्त पिंप्राळ्यातील विठ्ठल मंदिर संस्थान आणि वाणी पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. रथोत्सवाला चावडीपासून सुरुवात करण्यात येणार आहे. या रथोत्सवात महत्त्वाची भूमिका बजावणारे मोगरीधारकांचा दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील विमा काढण्यात आला असल्याची माहिती संस्थांचे सदस्य कल्पेश वाणी यांनी दिली आहे.