पाचोरा, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संघटना उभारणे आणि त्यांचे तत्वज्ञानाचा घराघरात प्रचार करणे हेच आमचे कर्तव्य आहे. त्यातच देशाचे हित असून हे कार्य शेवटच्या श्वास असेपर्यंत आम्ही करणार आहोत. याच अनुषंगाने २६ मार्च रोजी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्र्वर) येथे समता सैनिक दलाची सभा आयोजित करण्यात आली होती. रात्री ८ वाजता सभेला सुरुवात झाली. या सभेस केंद्रीय प्रचारक धर्मभुषण बागुल यांनी समता सैनिक दल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सविस्तर माहिती उपस्थित गावकऱ्यांना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी लोकशाही बद्दल दिलेले तत्वज्ञान, संविधानाचे सांगितलेले महत्व देशात कोणीही समजून घेतले नाहीत. विशेषतः आंबेडकरी अनुयायी देखील १४ एप्रिल रोजी जयंती साजरी करतात आणि ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त या महापुरुषाला अभिवादन करतात. या पलीकडे बाबासाहेबांचे तत्व, विचार आणि आणि कार्य समजून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे कुठे ही दिसत नाही अशी खंत बागुल यांनी बोलून दाखविली. संविधानाचा, आरक्षणाचा, लोकशाहीचा ज्यांना लाभ मिळतो असे करोडो लोक आणि त्यांचे ७ हजार जातीसमूह डॉ. बाबासाहेबांचे कठोर परिश्रम विसरून गेले आहे. बाबासाहेबांचा प्रचंड संघर्ष आणि त्याग विसरून गेले आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या संघटना आणि त्या संघटनांचे ध्येय देखील विसरून गेले आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकांच्या उद्धारासाठी तीन वेगवेगळ्या संघटना स्थापन केलेल्या आहेत. त्यातील पहिली संघटना समता सैनिक दल असून आज रोजी समता सैनिक दलासह इतर दोन्ही संघटनांची अवस्था खूप बिकट झाली आहे. या महान संघटना आपल्या नालायकपणामुळे – नाकर्त्यापणामुळे नेस्तनाबूत झाल्या आहेत. या संघटनांना पुन्हा उभे करण्याचे काम आम्ही आमच्या शिरावर घेतले असून शेवटचा श्र्वास असे पर्यंत आम्ही हे काम करणार आहोत असा निश्चय धर्मभुषण बागुल यांनी बोलून दाखविला. पहिल्या टप्प्यात जनजागृती करून समता सैनिक दलाचा प्रचार आणि संघटन बांधणी केली जाईल. अशा पद्धतीने या कार्याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.
राज्यात येत्या ५ वर्षात १ लाख सैनिक आणि १ कोटी सदस्य नोंदणी करून पुढील आंबेडकरी मिशनला सुरुवात केली जाईल. आम्ही खरे आंबेडकरी मिशन सुरू केले असून यासाठी प्रामाणिक, अभ्यासू , निष्ठावान, निस्वार्थी आणि शिस्तबद्धपणाने काम करणाऱ्या ध्येयवादी तरुणांची आवश्यकता असून तरुणांनी या कार्यात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले. देशात जात आणि धर्म यावरून कोणताही भेदभाव केला जावू नये. आपण सर्व भारतीय आहोत. सर्व समान आहोत अशी समता सैनिक दलाची भूमिका आहे. जात, धर्म, लिंग यावरून कोणतीही विषमता असेल तर ती नष्ट करणे आणि सर्वांगीण समता निर्माण करणे हे समता सैनिक दलाचे ध्येय आहे. हे याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले. विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे ध्येय, शिस्त आणि त्यांनी दिलेल्या ७ तत्वांची माहिती देवून त्यांचे आजच्या काळात देखील असलेले महत्व आणि आवश्यकता याबाबत सविस्तर मांडणी यावेळी करण्यात आली. जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे यांनी या सभेचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते सुकदेव सावळे, भारत सावळे, महेंद्र सोनवणे, शोभित सावळे, कैलास हिवाळे, प्रशांत सावळे, गजानन इंगळे, आदित्य सावळे, यश सावळे, केतन सावळे, निखिल सावळे, प्रशिक सावळे, रामलाल सावळे, पंकज सावळे, संदीप चोतमल, रतन सावळे सावळे, कमलेश सावळे, दीपक सावळे यांनी विशेष परिश्रम केले.
गावातील सर्व जाती समूहाचे तरुण या सभेस उपस्थित होते. त्यांना समता सैनिक दलात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी चाळीसगाव तालुका प्रचारक नितीन मरसाळे, बाबा पगारे, ज्येष्ठ सैनिक महेंद्र जाधव, विशाल पगारे, शाम चांदणे हे उपस्थित होते. जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे यांनी सभेचे प्रास्तविक केले व दलाचे सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. गावातील, तसेच जवळच्या परिसरातील तरुण, महिला मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित होते.
याप्रसंगी २१ तरुण आणि महिलांनी या वेळी समता सैनिक दलाचे प्रचाराचे कार्य करण्यासाठी आपली नावे पदाधिकाऱ्यांकडे दिली आहे.