जळगाव प्रतिनिधी । पाळधी, ता.धरणगाव येथील गोदाम फोडून २३ लाख रुपये किमतीचे टायर लांबविणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. यातील मुख्य म्होरक्याला शनिवारी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या टोळीत आणखी सहा जण निष्पन्न झाले असून त्यांच्या मागावर पोलिसांचे एक पथक कायम आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी शिवारात महेश लक्ष्मीनारायण पलोड यांच्या मालकीचे वाहनांच्या टायरचे गोदाम आहे. ९ सप्टेबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी गोदाम फोडून २३ लाख २० हजार ५७० रुपये किमतीचे टायर लांबविण्यात आले होते. तेथील सीसीटीव्ही कॅमेºयात एक जण अस्पष्ट कैद झाला होता. याप्रकरणी गोदामाचे व्यवस्थापक सदाशिव निंबा मराठे (४५, रा.खर्ची, ता. एरंडोल) यांच्या फिर्यादीवरुन धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा असे समांतर तपास करीत होते.
जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनाच अमरावती व उस्मानाबाद येथून गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंढे यांनी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी फुटेजच्या आधारावर सहायक फौजदार विजय पाटील, नरेंद्र वारुळे व योगेश सुतार यांच्या मदतीने तांत्रिक माहिती तसेच संशयिताचे स्केच तयार केले करुन ते सोशल मीडियावर राज्यभर व्हायरल केले होते. उस्मानाबाद जिल्ह्यात धागेदोरे मिळताच पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, रामकृष्ण पाटील, सुधारक अंभोरे, जितेंद्र पाटील, अशरफ शेख, अनिल देशमुख व इद्रीस पठाण यांचे पथक रवाना केले. संशयित हा तेरखेडा येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर १ आॅक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांना घेऊन असून अनिल बिसाराम शिंदे (४५, रा.तेरखेडा, ता.वाशी, जि.उस्मानाबाद) याला घरून अटक केली आहे.