पाळधी येथील कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

 

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी शासन आपल्या परीने निकराचे प्रयत्न करतच आहे. मात्र याच्या समूळ उच्चाटनासाठी आज समाजाने दातृत्वाची भावना दाखवून लोकसहभागाच्या माध्यमातून मदत करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.  पाळधी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात  लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन.पाटील होते.

याबाबत वृत्त असे की, सध्या कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक ठिकाणी रूग्णांना बेड देखील मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या विनंतीवरून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी या कामाचा आढावा घेत निर्देश दिले होते. यानंतर दिनांक ५ एप्रिल रोजी सायंकाळी एका छोटेखानी कार्यक्रमात याचे लोकार्पण ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे, प्रांताधिकारी गोसावी, तहसिलदार देवरे, संभाजी चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी सोनवणे, संजय पाटील, सचिन पवार,  प्रकाश पाटील,  आदीची उपस्थिती होती.

 याप्रसंगी पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, कोरोनाची वेळ ही घेण्याची नसून देण्याची आहे. खरं तर शासन याचा प्रतिकार करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून आता काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचा विचार करता आता समाजातून मदतीने हात समोर येण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात लोक सहभागातून अतिशय मोलाचे काम झाले होते. आता दुसर्‍या टप्प्यातही समाजाने दातृत्व दाखविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या कोविड केअर सेंटरसाठी मदत करणार्‍यांचे त्यांनी तोंड भरून कौतुक करतांना नागरिकांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. विशेष करून मास्कचा वापर अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर हा आवश्यक असेल तरच करावा असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

 

कोविड केअर सेंटर साठी प्रतापराव पाटील यांचा पुढाकार

पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटरमध्ये ३० जनरल बेड असून यासोबत येथे २५ ऑक्सीजन बेड आणि पाच मिनी व्हेंटीलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा परिसरातील कोरोनाच्या रूग्णांना उपचारासाठी उपयोग होणार आहे. विशेष बाब म्हणजे या कोविड केअरच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी ही गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन, सुगोकी ग्रुप आणि बीएनए इन्फ्रा यांनी संयुक्तरित्या उचलली आहे. अर्थात, हे कोविड केअर सेंटर लोकसहभागातून उभारण्यात आले आहे. तर हे कोविड केअर सेंटर जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या पुढाकाराने व  मार्गदर्शनाखाली कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यांच्या कुशल नियोजनाचा परिसरातील कोविडग्रस्तांना लाभ होणार आहे.

जळगाव येथिल डॉ. सुशील गुजर, डॉ. महेंद्र मल, डॉ.अपर्णा मकासरे, डॉ. पराग पवार हे या कोविड सेंटर मध्ये सेवा देणार असून गरज भासल्यास 50 बेड वरून 100 बेडची  व्यवस्था करणार असल्याचे जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी सांगितले.

 

लोकसहभागातील दाते

गुलाबराव पाटील फाउंडेशन,सुगोकी ग्रुप, कासट स्टोन, बी एन ए इन्फ्रास्ट्रक्चर, उदय कृषी केंद्र,एन एस जैन,एस पी डेव्हलपर्स, लक्ष्मी नारायण सन्स ,संभाजी चव्हाण,रोटरी क्लब, अनिल सोमाणी, चंदन कळमकर, अरुण पाटील, चंदू माळी, भिकन नन्नवरे, किशोर पाटील , भागवत शेठ, मुनाशेठ  पलोड, प्रतापराव पाटील मित्र परिवार ग्रुपने अनमोल सहकार्य व मदत केल्याने कमी कालावधीत सदर कोविड सेंटर उभारता आले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार सागर मुंदडा यांनी केले.

 

Protected Content