चोपडा प्रतिनिधी । जगभरात थैमान घालणार्या कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक असणारी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अलबम ३० या होमिओपॅथी औषधीचे वाटप महाराष्ट्र पालिवाल परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
पालीवाल परिषदेतर्फे समाजबांधवांच्या घरी जाऊन या औषधीचे वाटप करण्यात आले. या वेळी समस्त पालिवाल समाजबांधवांना या गोळीबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली. गोळ्या घेण्याच्या वेळा, त्यासाठी पाळावी लागणारी पथ्ये आणि इतर शंकांचेही यावेळी आरोग्यमम ई एच हेल्थकेअरचे डॉ. विशाल राजेंद्र पालिवाल यांनी निरसन केले. चोपड्यातील हा स्तुत्य उपक्रम जळगाव जिल्ह्यातील पालिवाल समाजात सर्वच कुटुंबियांना गोळ्याचे वाटप करून राबवण्यात येणार असल्याची माहिती परिषदेच्या वतीने अध्यक्ष कांतीलाल पालिवाल, महामंत्री अनिलकुमार पालिवाल व चोपडा अध्यक्ष प्रदीप पालिवाल यांनी दिली आहे.
याप्रसंगी माजी अध्यक्ष राजेंद्र भालचंद्र पालिवाल, प्रवीण पालिवाल आदी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील लासूर, चौगाव, गोरगावले, लोहारा, नेरी, नांद्रा, रोटवद, जळगाव, देवपिंप्री, पाचोरा, वरखेडी येथेही या औषधीचे वाटप मआरोग्यममतर्फे केले जाणार असल्याचे डॉ. विशाल पालिवाल यांनी या वेळी सांगितले. कोरोना संकटकाळात अविरत रुग्णसेवा करणार्या मकरोनायोद्धाफ ठरलेल्या डॉ. विशाल पालिवाल यांच्या या उपक्रमाचे समाजबांधवांनी कौतुक केले आहे. अशाप्रकारे हा उपक्रम पुढील काळात पुणे, नाशिकमध्येही राबविण्याचा मानस डॉ. पालिवाल यांनी बोलून दाखवला.