मुंबई वृत्तसंस्था । पालघर येथे गुरुवारी १६ रोजी मध्यरात्री दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात राजकारण सुरू झालं असून सोशल मीडियावरून विद्वेष पसरवणारे मेसेजही फिरवले जात आहेत. पालघर येथे मॉब लिंचिंगची घटना घडल्याचं उघडकीस होताच पोलिसांनी घटनास्थळी जावून आरोपींना तात्काळ ताब्यात घेतलं. पोलिसांनी एकूण १००हून अधिक जणांना अटक केली असून त्यात पाच मुख्य आरोपी आणि ९ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली.
पालघरमध्ये चोरीच्या संशयातून शेकडो जणांच्या झुंडीने केलेल्या तिघांच्या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभरातून उमटत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली. तर खासदार गौतम गंभीर, कुस्तीपटू बबिता फोगाट, अभिनेता फरहान अख्तर अशा विविध स्तरातील व्यक्तींनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण?
गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी (16 एप्रिल) रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहनचालक नीलेश तेलगडे, साधू स्वामी कल्पवृक्ष गिरिजी, स्वामी सुशील गिरिजी असे तिघे जण होते. दोन साधू नाशिकमधील त्र्यंबकेश्वरला निघाले होते. दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली.
पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत सर्वांना ताब्यात घेतलं. डहाणू न्यायालयाने 101 आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.