जळगाव , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | घरातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूची पोकळी कुणी भरून काढू शकत नाही. मात्र या आपत्तीच्या काळात शासन आपल्या सोबत असून आपण नव्याने आयुष्यात उभारी घ्यावी अशा भावना आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्या. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील २३ महिला व पुरुषांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत ४ लाख ६० हजाराचे मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले आहेत. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील बोलत होते. अजिंठा विश्रामगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ३ महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत जळगांव तालुक्यातील २३ व्यक्तींना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे एकूण ४ लाख ६० हजाराचे मंजूर प्रस्तावाचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार नामदेव पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती नंदलाल पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष रमेशआप्पा पाटील, बाजार समिती संचालक पंकज पाटील, उमाजी पांगळे, गोरख बारी, अव्वल कारकून सुभाष तायडे आणि के.आर. तडवी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगायो तालुकाध्यक्ष रमेशआप्पा पाटील, आभार नायब तहसीलदार राहूल वाघ यांनी मानले. प्रास्ताविकात तहसीलदार नामदेव पाटील यांनी योजनेची माहिती विशद केली.
या प्रसंगी तहसीलदार नामदेव पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, प्रभाकर कांबळे, संगायोचे तालुका अध्यक्ष रमेश आप्पा पाटील, कृ. ऊ. बा. चे संचालक पंकज पाटील, उमाजी पांगळे, गोरख बारी आदींची उपस्थिती होती.
तालुक्यातील २३ लाभार्थ्यांना लाभ
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते तरसोद येथील झावरू भील, हिरामण पवार; आसोदा येथील श्रीमती निकिता माळी, कल्पना कोळी; मोहाडी येथील आशाबाई चव्हाण; शिरसोली प्र. बो. येथील अंजनाबाई बारी, मंजुळाबाई बारी, मंगेश गुरव, नौसराबाई पाटील, निता काळे; खेडी खुर्द येथील अनिता भील, चिंचोली येथील मनीषा वाघ, लताबाई आवार; देवगाव येथील जनार्दन सोनवणे, वसंतवाडी येथील सरस्वती मोरे, बेबाबाई रोकडे, सुनंदा भील; भादली बुद्रुक येथील रजनी ठोसर, सुनंदा कोळी; उमाळे येथील रत्नाबाई शिंदे, नशिराबाद येथील हेमांगी माळी, देवगाव येथील जनाबाई शिरसाठ या लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.