पालकमंत्र्यांच्या हस्ते तरडे व अहिरे येथे शेतरस्त्यांसह विकासकामांचा शुभारंभ !

धरणगाव, प्रतिनिधी | मतदारसंघातील प्रत्येक गावातील शेत-शिवारांना जोडण्यासह नागरिकांसाठी आवश्यक असणार्‍या सर्व विकासकामांना आता प्रचंड गती मिळालेली आहे. विकासात कोणताही भेदभाव करण्यात येत नसून ग्रामस्थांनी आता कामे सुचवल्यास त्यांना तात्काळ निधी प्रदान करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

 

धरणगाव तालुक्यातील तरडे आणि अहिरे बुद्रुक या गावांमध्ये शेतरस्त्यांचे डांबरीकरण आणि अन्य सुमारे १ कोटी ३० लक्ष रूपयांच्या कामांचा शुभारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेत रस्त्यांच्या कामांना विशेष करून प्राधान्य देण्यात येत असल्याचे आवर्जून नमूद केले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील तरडे आणि अहिरे येथे विकासकामांचे भूमिपुजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका प्रमुख गजानन पाटील, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील,  युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील, उपतालुका प्रमुख पवन पाटील, उपसभापती प्रेमराज बापू पाटील, दीपक सोनवणे, डी. ओ. पाटील, लोकनियुक्त सरपंच अशोक पाटील, उपसरपंच सौ. अनिता पाटील, परिसरातील सरपंच भैय्या पाटील, डॉ. विलास पाटील, गणेश पाटील, कैलास पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विकासो संचालक, सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच चंद्रशेखर भाटीया यांनी केले. सूत्रसंचालन युवा सेना उपतालुका प्रमुख पवन पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांनी केले.

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चमगाव फाटा ते उखळवाडी शेतरस्त्याचे डांबरीकरण करणे ( ५० लक्ष रूपये ) ; तरडे ते भवानी माता मंदिर शेतरस्त्याचे डांबरीकरण करणे ( ५० लक्ष रूपये ) या दोन रस्त्यांच्या कामांचे भूमिपुजन करण्यात आले. यासोबत अहिरे बुद्रुक येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपुजन ( १० लक्ष ) आणि रस्ता कॉंक्रीटीकरण ( ६ लक्ष रूपये ) या कामांचा शुभारंभ देखील करण्यात आला. तर तरडे येथील सामाजिक सभागृहाचे भूमीपुजन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
शिवसेना जळगाव लोकसभा क्षेत्राचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील आणि तालुका प्रमुख गजानन पाटील यांनी आपल्या मनोगतातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. विशेष करून तालुक्यातील शेतरस्त्यांच्या डांबरीकरणामुळे शेतकरी समाधानी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण भागातील शेतरस्ते हे इतिहासात पहिल्यांदाच शासकीय पातळीवर डांबीकरणाच्या माध्यमातून तयार करण्यात येत असून याचा शेतकर्‍यांना लाभ होणार असल्याचे प्रतिपादन केले. शेत-शिवार जोडल्यास याचा शेतकर्‍यांना आणि पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला लाभ होणार असून याचमुळे आपला शेतरस्त्यांवर प्रामुख्याने भर असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले. तर जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास करण्याला गती आली असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही दिली.

….आणि पालकमंत्री बनले फोटोग्राफर !

ना. गुलाबराव पाटील यांनी दोन्ही शेतरस्त्यांच्या कामांच्या भूमिपुजनाचा मान युवासेवा उपतालुका प्रमुख पवन पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांना दिला. तर ते याच्या फलकाचे अनावरण करत असतांना स्वत: पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी हातात स्मार्टफोन घेऊन त्यांची छायाचित्रे काढली. ना. गुलाबराव पाटील यांना साधेपणा आणि कार्यकर्त्यांना सन्मान प्रदान करण्याच्या स्वभावाचे याप्रसंगी उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.

Protected Content