पारोळा प्रतिनिधी । येथील शिंदे गल्ली व गोडबोले गल्लीच्या चौफुलीवर गायत्री परिवार व मनवंतराव साळुंखे यांच्या पुढाकाराने कोरोनाशी लढाईच्या संकल्पनेवर आधारित आरोग्याची गुढी उभारण्यात आली आहे.
शहरातील शिंदे गल्ली व गोडबोले गल्लीची चौफुली बाजार पेठेला लागुन आहे. गणेश शिंपी यांच्या मोक्याच्या दर्शनी जागेवर राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे व गायत्री परिवाराचे माधवराव शिंपी, गणेश शिंपी, प्रकाश शिंपी, मयुर शिंपी, हर्षल शिंपी व आदित्य शिंपी यांनी गुढी उभारू आरोग्याची, कोरोनाशी लढण्याची या संकल्पनेवर आधारित गुढी उभारून जनजागृतीचे सुंदर व प्रभावी कार्य केले आहे .सौ वैशाली शिंपी यांनी गुढीचे पुजन करुन संदेश म्हणुन गुढीलाही मास्क लावला.
गुढीच्या भोवती खोकतांना शिंकतांना रुमाल आडवा धरा, मास्क व रुमाल वापरा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवा, हस्तांलोदन टाळा, सॅनिटायझर वापरा, गर्दीत जावुन नका घरीच थांबा, प्रशासनाच्या सुचना व नियम पाळा अशा विविध जागृतीपर सुचना फलक लेखन करुन लावण्यात आल्या आहेत. तिकडुन वावरणार्या अनेक लहान थोरांनी कुतुहलाने थांबुन गुढीचे अवलोकन करुन सुचना वाचल्या व या आरोग्य गुढीचे कौतुक केले. गायत्री परिवार पारोळा सदैव समाज जागृतीचे स्तुत्य कार्य करीत असते.