जळगाव प्रतिनिधी । निर्धार योग प्रबोधिनी आणि काबरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी गावात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधींचे वाटप करण्यात आले.
कोविड-१९ च्या प्रभावामुळे आपल्या देशावर आलेल्या संकटावर एकजुटीने मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची रोगप्रतिकारक शक्ती सशक्त असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात या औषधी पोहचण्यास वेळ असल्यामुळे निर्धार योग प्रबोधिनी आणि काबरा फाउंडेशनचे डॉ. महेंद्र काबरा यांच्या माध्यमातून सेवाकार्य करण्यास प्रारंभ करण्यात आला. मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी गावातील सुमारे सहाशे परिवारास ‘अर्सेनिक अल्बम-३०’ आणि आयुर्वेदिक काढा या औषधींचे वाटप करण्यात आले. यावेळी निर्धार योग प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सचिव कृणाल महाजन आणि योगसाधक योगराज चौधरी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी गावातील नागरिकांना प्राणायामाचे महत्व पटवून देण्यात आले. प्राणायामाच्या अभ्यासाने फुफ्फुसांची क्षमता अधिक दृढ करता येवू शकते. तसेच प्राणायामाच्या माध्यमातून अनेक असाध्य आजारांवर मात होऊ शकते. म्हणून ग्रामस्थांकडून प्राणायामाचे प्रात्यक्षिक करवून घेत नियमित प्राणायामाचे आश्वासन घेण्यात आले.
यासाठी डॉ. महेंद्र काबरा, डॉ.यशोवर्धन काबरा यांचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रम यशस्वितेसाठी उपाध्यक्षा स्मिता पिले, सरपंच रामा कोळी, पोलीस पाटील राहुल पाटील, दामोदर पाटील आणि भगवान चौधरी यांचे सहकार्य लाभले.